अशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये; लेकरांचा मृतदेह बॅगेत भरुन आणला घरी
माता पित्यांच्या डोळ्यादेखत लेकरांचा मृत्यू झाला. मात्र, मुलांच्या मृत्यूनंतर देखील या माता पित्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे यांना आपल्या लेकारांचे मृतदेह बॅगेत भरुन घरी घेवून जावे लागते आहेत.
West Bengal Child Death: परिस्थितीमुळे हतबल झालेल्या लोकांच्या नशिबी मृत्यूनंतरही फक्त यातनाच असतात. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका पित्याला आपल्या मृत लेकरांचे मृतदेह बॅगेत भरुन घरी आणावे लागले आहेत. रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे या पित्याला काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला. या घटनेचे फोटो पश्चिम बंगालमधील एका बड्या राजकीय नेत्याने सोशल मिडियावर शेअर केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हतबल पित्याला पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रु
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरच्या कालियागंजमध्ये हा प्रकार घडला आहे. जेव्हा हा पिता आपल्या मुलांचे मृतदेह घेवून गावात आला तेव्हा बॅगेत भरलेले हे मृतदेह पाहूून ग्रामस्थांचे डोळे पाणावले. ग्रामस्थांनी या पित्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
मृतदेह बॅगेत भरुन आणण्याची वेळ का आली?
असीम देव शर्मा असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. कालियागंज ब्लॉकच्या मुस्तफानगर ग्रामपंचायतीच्या डांगीपारा गावात राहणाऱ्या असीम देव शर्मा यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. जन्मांनतर पाच महिन्यांनी दोन्ही मुले आजारी पडली. गेल्या रविवारी असीम यांनी आपल्या दोन्ही मुलांना कालियागंज शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, दोन्ही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलांचे मृतदेह घरी नेण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका शोधली. मात्र, रुग्णवाहिका चालकाने आठ हजार रुपये मागितले. मात्र, पैसे नसल्यामुळे रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घरी घेऊन जाण्यास नकार दिला. यामुळे असीम आणि त्यांच्या पत्नीने मृतदेह बॅगांमध्ये भरुन घरी जाण्याचा निर्णय घेतला.
मृतदेहांच्या बॅगा घेवून बसमध्ये चढले
हे माता पिता मृतदेहांच्या बॅगा घेवून बसमध्ये चढले. यानंतर बसमधील प्रवाशांना या मातापित्याची हतबलता पाहून धक्का बसला. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी याघटनेचे फोटो ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पैसे नसल्यामुळे या मातापित्यावर आपवल्या मुलांचे मृतदेह बॅगेत भरुन बसणदून प्रवास करण्याची नामुष्की ओढावली आहे. सराकरी अनास्थेमुळे या मातापित्यावर हा गंभीर प्रसंग ओढावल्याचा आरोप शुभेंदू यांनी केला. पश्चिम बंगालमधील जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे भयान वास्तव पहायला मिळते असा आरोप देखील त्यांनी केला आहे.