छत्तीसगडमध्ये आयकर विभागाची धाड, कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त
छत्तीसगडमध्ये आयकर विभागाकडून मोठी कारवाई, कोट्यवधींचा ऐवज जप्त
रायपूर: आयकर विभागाने मोठी कारवाई छत्तीसगडच्या काही जिल्ह्यांमध्ये केली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या एक नेता आणि कोळसा घोटाळ्याशी संबंधीत काही ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये रायपूर, महासमुंद इथे एका घरावर छापेमारी करण्यात आली.
कोरबा इथे ट्रान्सपोर्टरच्या दुकानातही आयकर विभागाने धाड टाकली. खाणीतून ट्रकमधून कोळसा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून नेणाऱ्या ट्रान्सपोर्टरच्या घरीही आयकर विभागाने धाड टाकली. अधिकारी संपूर्ण 2 दिवस कागदपत्रांची पडताळणी करत होते.
आयकर विभागाने छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी कारवाई केली. कोळसा वाहतूक आणि इतर संबंधित व्यवसायात गुंतलेल्या एका गटावर छापा टाकल्याचे सांगण्यात येत आहे. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे बोलले जात आहे.
या कारवाईला 30 जूनपासून सुरुवात करण्यात आली होती. यादरम्यान रायपूर तसेच भिलाई, कोरबा बिलासपूर, रायगड आणि सूरजपूरच्या 30 हून अधिक ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईमध्ये अनेक दोषी कागदपत्रे, अक्षेपार्ह ऐवज आणि डिजिटल पुरावे समोर आले आहेत, जे आयकर विभागाने जप्त केले. यामध्ये गटाने गैरमार्गाचा वापर करून कोळशातून बेहिशेबी उत्पन्न निर्माण केलं आणि हा घोटाळा केल्याचं समोर आलं.
या कारवाई दरम्यान काही कागदपत्र अशी सापडली आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे गैरव्यवहार आणि गुंतवणूक करण्यात आली आहे. 50 एकर स्थावर मालमत्तेचं आणि गुंतवणुकीची स्त्रोत आणि कागदपत्र तपासले जात आहे. उत्पन्नापेक्षा जास्त रोकड, दागिने आणि अनेक महत्त्वाच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळाल्याची चर्चा आहे. अद्याप तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाई दरम्यान घराबाहेर संपूर्ण जवानांची टीम आणि मोठा फौजफाटा तैनात होता. परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये सोडलं जात नव्हतं. अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला बाहेर सोडलं जात नव्हतं. आतापर्यंत 45 कोटी आणि काही पुरावे आयकर विभागाने जप्त केले आहेत. या पुराव्यांसोबत काही पैसे हे निवडणुकीसाठी वापरण्यात आल्याचीही शंका आयकर अधिकाऱ्यांना आहे.
कोथारी इथल्या एका कोळसा धुण्याच्या कारखाण्यातून शंभर कोटींचा कोळसा विकला जात असल्याची चर्चा आहे. यासोबत ट्रान्सपोर्टच्या नावाने 77 लाख रुपयांची जमीन रजिस्ट्रर करण्यात आली आहे. एकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळ्या 5 एन्ट्री करण्यात आल्या आहेत. ही रक्कम जवळपास 23 कोटी रुपये आहे. त्यामुळे या प्रकरणी आयकर विभागाकडून सध्या कागदपत्र पडताळणी सुरू आहे.
या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे बिलासपूरमध्ये आणखी एक घर आहे, तिथेही तपास केला जात असल्याची चर्चा होती. या कारवाईमुळे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता कोणाकोणावर कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.