नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपचे दिल्लीतील आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाकडून शुक्रवारी छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांहून अधिक रोकड आढळून आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई सुरू करण्यात आली. बाल्यान हे उत्तर नगर मतदारसंघाचे आमदार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सेक्टर १२ पॉकेट ६ के फ्लॅट नंबर ८६ मध्ये नरेश बाल्यान यांना पकडण्यात आले. छापेमारी करण्यात आलेले ठिकाण हे प्रदीप सोलंकी नावाच्या एका प्रॉपर्टी डीलरचे कार्यालय असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलंकीचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रक्कम ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा तपास अधिकारी करत आहेत. ही रोकड आपचे आमदार नरेश बाल्यान यांच्या एका नातेवाईकाची असल्याचे आपचे कार्यकर्ते ऑफ द रेकॉर्ड सांगत आहेत. प्राप्तीकर विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली असून याबाबत तपास सुरू आहे. 





नरेश बाल्यान राहत असलेल्या परिसरातही छापेमारी सुरू आहे. आम आदमी पक्षाकडून याबाबत कोणतेही विधान करण्यात आले नाही. लोकसभा निवडणूकांपूर्वी केली गेलेली ही छापेमारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्राप्तीकर विभागाकडून बाल्यान आणि सोलंकीच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. प्राप्तीकर विभागाच्या आठ अधिकाऱ्यांची टीम याबाबत अधिक तपास करत आहे.