INCOME TAX रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ, २५ टक्केची वृद्धी
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २५ टक्के ही वाढ झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसे ट्विट या मंत्रालयाने केलेय.
नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २५ टक्के ही वाढ झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसे ट्विट या मंत्रालयाने केलेय.
अर्थमंत्रालयाने दिलेल्या मुदतीत आयकर भरणाऱ्यांची संख्या यावर्षी वाढली आहे. नोटाबंदीनंतर देशातल्या आयकर विवरणपत्राद्वारे वेळेत संपत्ती जाहीर करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल २५ टक्के वाढ झालीय. ५ ऑगस्टला संपलेल्या मुदतीत देशातील तब्बल २ कोटी ८२ लाख ९२ हजार ९५५ लोकांनी आयकर विवरणपत्र भरली आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहे.
गेल्यावर्षी २ कोटी २६ लाख ९७ हजार ८४३ लोकांनी आयकर विवरण पत्र भरली होती. गेल्य़ावर्षी विवरण पत्र भरणाऱ्यांच्या संख्येत फक्त १० टक्के वाढ झाली होती. वैयक्तिक विवरणपत्र भरणाऱ्यांमध्ये साधरणतः २५.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारने नोटाबंदीपासून सुरू केलेल्या ऑपरेशन क्लीन मनीचं हे यश असल्याचं सूत्रांनी म्हटले आहे.
आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांपैकी ९१ लाख नवीन आयकर दाते आहेत, असंही आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. मात्र, आयकर विभागाने ही तारीख पुन्हा वाढवली. ५ ऑगस्टपर्यंत ही वाढ करण्यात आली.