नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारातील इंधनाच्या किंमतीवरही होत आहे. ९ फेब्रुवारीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. रविवारी सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात १६ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ७६.३९ रूपये तर डिझेल ६९.०९ रूपये इतके आहे. राजधानी दिल्लीतही इंधन दरात वाढ झाली असून पेट्रोल १६ पैसे तर डिझेल १२ पैशांनी महागले आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ७०.७६ आणि डिझेल ६५.९८ रूपये इतका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल निर्यात कंपन्यांचा समूह 'ओपेक' अर्थात 'ऑर्गेनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कन्ट्रीज'द्वारा करण्यात येणाऱ्या तेल पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. 'ओपेक'चा सर्वात मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाने मार्चपर्यंत आपल्या उत्पादनात ५ लाख बॅरेल प्रतिदिन कपात करणार असल्याचे घोषित केले आहे. रशियानेही आपल्या उत्पादनात मोठ्या कपातीची तयारी केली आहे. या कपातीचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होणार असून यामुळे भारतीय बाजारात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


'ओपेक' देशांकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. शनिवारी ब्रेंट क्रूडच्या किंमतीत १.६८ रूपयांची वाढ झाली असून त्याचा दर ६६.२५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा दर ५५.९८ डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून परिणामी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.