मुंबई : भारताच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह काही परदेशी पाहुण्यांचीही उपस्थिती होती. या खास क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. ज्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करत काही महत्त्वाचे संदेश दिले आणि या खास दिवसाच्या सर्वांनाच शुभेच्छाही दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदींनी केलेल्या भाषणात दहशतवादापासून अनुच्छेद ३७० रद्द करण्यापर्यंतच्या बऱ्याच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आणि विविध माध्यमातून हा सोहळा पाहणाऱ्या सर्वांनाच उद्देशून मोदींनी आणखीही काही महत्त्वाची आवाहनं केली. 


पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीने २०२२ पर्यंत देशातील किमान १५ पर्यटन स्थळांना भेट द्या असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. भारतामध्ये असणारं नैसर्गिक सौंदर्य, प्रत्येक ठिकाणाचं वेगळेपण या गोष्टी लक्षात घेत त्यांनी दुर्गम भागांमध्ये जाण्याची बाब मांडली. 'तुम्ही दुर्गम ठिकाणी गेलात तरच त्या भागात पर्यटन सुविधा विकसित होतील', असं ते म्हणाले. आपण दुर्गम स्थळांवर गेलो तरच जगभरातील अनेकजणही त्या ठिकाणांना भेट देतील, असा विचार त्यांनी सर्वांसमोर ठेवला.



पर्यटनाकडे वाढता ओघ आणि एकंदरच गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात झालेली आणि येत्या काळात होणारी प्रगती पाहता पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात हा उल्लेख जाणिवपूर्वक केला. काही वेळा अवघड परिस्थितीचा सामना करणंही चांगलं असतं असं म्हणत संकटं स्वीकारण्याचं मनोबळ त्यांनी या भाषणातून दिलं. पंतप्रधानांच्या भाषणात पर्यटनाला मिळालेलं महत्त्व पाहता आता येत्या काळात याच क्षेत्रासाठी केंद्राकडून कोणत्.या तरतूदी केल्या जातात हे पाहणं मह्त्त्वाचं ठरेल.