Independence Day 2022 : संगीताला कोणतीही सीमा नसते आणि कोणतीही सीमा त्याला रोखू शकत नाही, असे म्हणतात. संगीतकारांनी नेहमीच आपल्या संगीताद्वारे देशांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची गाणी (Indian Music) पाकिस्तानातही (Pakistan) मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. तसेच पाकिस्तानची गाणी भारतातही खूप लोकप्रिय आहेत. आता एका पाकिस्तानी संगीतकाराने भारताला स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day) एक खास भेट दिली आहे. या भेटीची सध्या सोशल मीडियावर जोरजार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातसह आणि जगभरातील भारतीयांनी सोमवारी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. यादरम्यान विविध देशांकडून भारताला शुभेच्छा देण्यात येत आहेत. सीमेपलीकडील, पाकिस्तानमधील (Pakistan) एका संगीतकाराने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या कलाकाराने रबाबवर भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' वाजवून  देशाला अनोखी भेट दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


पाकिस्तानचा रबाब वादक सियाल खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय राष्ट्रगीत वाजवतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रबाब हे एक तंतुवाद्य आहे. ते वीण्यासारखे असते. हे वाद्य पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे. 


व्हिडिओमध्ये सियाल खान त्याच्या रबाबवर 'जन गण मन' वाजवताना दिसत आहे. त्याच्या मागे शांत सुंदर पर्वत आणि हिरवळ आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्याने , "सीमेपलीकडील माझ्या प्रेक्षकांसाठी एक भेट," असे म्हटले आहे.


"भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. शांतता, सहिष्णुता आणि आपल्यातील चांगल्या संबंधांसाठी मैत्री आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे, " असे या संगीतकाराने पुढे म्हटले आहे. 



 ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दहा लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे आणि त्याला जवळपास 50 हजार लाईक्स मिळाले आहेत.