नवी दिल्ली : देशात आजा ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. लडाख भागातील लेहमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिक आपला आनंद साजरा करताना दिसले. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संसदेकडून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर लडाख हा भाग जम्मू-काश्मीरपासून वेगळा होत केंद्रशासित प्रदेश होत आहे. अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर लेहमध्ये साजरा झालेला हा पहिलाच स्वातंत्र्यदिन होता. यावेळी, लडाखहून भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर केलेत. नामग्याल यांचा यावेळचा एक डान्स करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुच्छेद ३७० हटवण्याचं विधेयक संसदेत मांडल्यानंतर लोकसभेत केलेल्या भाषणामुळे जामयांग सेरिंग नामग्याल चर्चेत आले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक भाजपा खासदारांनी या भाषणाबद्दल त्यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं.  


भारताचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून देशाला संबोधित केलं. तर खासदार नामग्याल यांनी आपल्या लोकांसोबत हा दिवस साजरा केला. लेहमध्ये पारंपरिक वेषात डान्स करताना नामग्याल या व्हिडिओत दिसत आहेत.