मुंबई : गर्भपात करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऐतिहासिक निकाल दिलाय. विवाहित असो वा अविवाहित सुरक्षित कायदेशीर गर्भपात हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार (Medical Termination of Pregnancy) भारतात अविवाहित महिलांना आता 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी महिलांना गर्भपात (Abortion) करण्यासाठी कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत होतं. गर्भपातासाठी वेगवेगळे जीवघेणे मार्गही पत्करले जाऊन मृत्यू झाल्याच्या असंख्य घटना आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणाच्या (national Family Health survey) आकडेवारीनुसार भारतातील जवळजवळ निम्म्या महिलांनी मनाविरुद्ध जाऊन गर्भपात केले आहेत. सर्वेक्षणात गर्भपाताशी संबंधित अनेक सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणे उघड झाली आहेत.


भारतात महिला गर्भपात का करतात?


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार भारतातील निम्म्या महिलांचे मनाविरुद्ध (Unwanted) किंवा अनियोजितवेळी गर्भपात केले जातात. आकडेवारीनुसार 47.6 टक्के गर्भपात अनियोजितवेळी (Unplanned) केले जातात. तर 11.03 टक्के गर्भपात आरोग्याशी निगडीत कारणांमुळे होतात. 9.7 टक्के गर्भपाताची कारणे नवजाताची योग्य वाढ न होणे आहे. 9.1 टक्के गर्भपात काही वैयक्तिक कारणांमुळे केले जातात. तर 4.1 टक्के गर्भपात हा पती किंवा सासू-सासऱ्यांच्या इच्छा नसल्यास केला जातो.


भारतात 3.4 टक्के गर्भपात हे आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे केले जातात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल अशा राज्यात आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे गर्भपात करण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचबरोबर 2.1 टक्के गर्भपाताचं कारण म्हणजे गर्भात मुलगी असणे आहे. जेव्हा भारतात गर्भातील गर्भाचे लिंग जाणून घेणे कायदेशीर गुन्हा होते तेव्हाची ही परिस्थिती आहे. तर 12.7 टक्के गर्भपात हा इतर कारणांमुळे होतो.


असुरक्षित गर्भपात करण्यामागे कोणती कारणं आहेत?


भारतात सर्वात जास्त असुरक्षित गर्भपात केले जातात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5च्या आकडेवारीनुसार भारतात 27 टक्के गर्भपात हे घरातच केले जातात. महिलांना किंवा मुलींना कुठल्याही रुग्णालयात दाखल न करता घरातच त्यांचा गर्भपात केला जातो. यामुळे महिलांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे असुरक्षित गर्भपात केल्याने अनेक महिलांना आपला जीव गमावावा लागतो. शहरात 21.6 टक्के गर्भपात महिला स्वत:च करून घेतात. तर ग्रामीण भागात घरातच गर्भपात करण्याचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत आहे.


भारतातील 54.8 महिलांपैकी निम्म्याहून अधिक महिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडे जातात. तर भारतात 3.5 टक्के गर्भपात मित्र आणि नातेवाईकांकडून केले जातात.


असुरक्षित गर्भपातामुळे दररोज 8 महिलांचा मृत्यू


संयुक्त राष्ट्रच्या (United nations) जागतिक लोकसंख्या अहवाल 2022 नुसार, भारतात असुरक्षित गर्भपातामुळे दररोज जवळपास 8 महिलांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर असुरक्षित गर्भपात हे भारतातील महिलांच्या मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2007 ते 11 दरम्यान भारतात 67 टक्के असुरक्षित अबॉर्शन झाले आहेत.


राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांपेक्षा दिल्लीत गर्भपात करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. दिल्लीमध्ये 5.7 टक्के महिला या गर्भपाताचा पर्याय निवडतात. राजस्थानमध्ये याचा आकडा 1.5 टक्के तर मध्य प्रदेशमध्ये 1.3 टक्के आहे. 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गर्भपाताचा पर्याय निवडणाऱ्या महिलांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 2.9 पेक्षा जास्त आहे.