India Cements ED Raid: एकीकडे झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली असतानाच तामिळनाडूमधूनही एक बातमी समोर येत आहे. राज्याचे राजधानीच्या शहरामधील म्हणजेच चेन्नईमधील इंडिया सीमेंट्सच्या परिसरामध्ये सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सीमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सीमेंट्स ही भारतामधील आघाडीच्या सीमेंट कंपनीपैकी एक आहे. कंपनीच्या मुल्यानुसार ही शेअर मार्केटवर लिस्टेट असलेली 9 वी सर्वात मोठी सीमेंट कंपनी आहे. इंडिया सिमेंट्सचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एकूण 7 कारखाने आहेत. विशेष म्हणजे 2008 ते 2014 या 6 वर्षांच्या कालावधीसाठी या कंपनीकडे इंडियन प्रिमिअर लिगमधील चेन्नई सुपर किंग्ज कंपनीचे मालकी हक्क होते.


एन. श्रीनिवास यांच्या अडचणी वाढणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीम्सकडून एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या अन्य ठिकाणांवरही छापेमारी केली जाणार आहे. एन. श्रीनिवासन इंडिया सीमेंट्सचे सर्वेसर्वा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ईडीच्या या छापेमारीमुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एन. श्रीनिवासन यांच्या चेन्नईबरोबरच इतर काही ठिकाणीही संपत्ती आहे. 


चेन्नई सुपर किंग्जचे प्रमोटर


मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एन. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्जस लिमिटेडचे प्रमोटर म्हणून पुन्हा सीएसकेशी जोडले गेले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला.


सोरेन यांना ईडीमुळे द्यावा लागला राजीनामा


सक्तवसुली संचलनालयाकडून भ्रष्टाचाराविरोधातील धडक मोहीम सुरु आहे. नेत्यांपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकांविरोधात ईडीकडून कारवाई केली जात आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्यामधील आरोपांमुळे सोरेन यांना 31 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सोरेन यांना अटक करण्यात आली. सध्या सोरेन ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. 


केजरीवाल यांना ईडीचे 5 समन्स


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही ईडीच्या रडारवर आहेत. मद्य धोरण प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. ईडीकडून यासंदर्भात आतापर्यंत केजरीवाल यांना 5 वेळा समन्स पाठवण्यात आले आहेत. ईडीने गुरुवारी पाठवलेल्या समन्समध्ये केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. आता केजरीवाल चौकशीसाठी हजर राहतात का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महाराष्ट्रात ईडीच्या रडारवर रोहित पवार


महाराष्ट्रामध्येही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज बारामती ॲग्रो प्रकरणात ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे.