Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीतला गोलमार सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अधिकारी असलेला भाजप (BJP) पदाधिकारी मतपत्रिकांची खाडाखोड करताना जगानं पाहिला. आप (AAP) आणि काँग्रेसच्या (Congress) 8 नगरसेवकांची मतं बाद ठरवून भाजपचा महापौर (BJP Mayor) विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी हेराफेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली. या महापौर निवडीला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आलं तेव्हा, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं निवडणूक अधिकारी मसी यांची अक्षरशः पिसं काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक अधिकाऱ्यांनी  इंडिया आघाडीची मतं जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा आरोप केला जात आहे. महापौर निवडणुकीत आप-काँग्रेस उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मते मिळाली. प्रत्यक्षात त्यांना 20 मते मिळणे अपेक्षित होतं. चंदीगड महापालिकेत भाजपचे 14 नगरसेवक आहेत तर आपचे 13 नगरसेवक आहेत. याशिवाय काँग्रेसचे 7 तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. विजयी मतं मिळवण्यासाठी 19 मतांची गरज होती. अशा परिस्थितीत भाजपकडे 14 नगरसेवक आणि एक खासदार आणि शिरोमणी अकाली दलाच्या एका नगरसेवकाचं अशी 16 मतं होती. 


तर आम आदमी पार्टीकडे 13 आणि काँग्रेसची 7 अशी 20 मतं होती. 20 मतांपैकी 8 मतं फेटाळण्यात आली. त्यामुळे आप-काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदार कुलदीप यादव यांच्याकडे केवळ 12 मतं राहिली. त्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. 


निवडणुकीत हेराफेरी, कोर्टाकडून खरडपट्टी
ही तर लोकशाहीची हत्या आहे. या निवडणुकीशी संबंधित सगळ्या मतपत्रिका जप्त करा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तसंच निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत चंदीगड महापालिकेची बैठक घेऊ नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. 


याबाबतची पुढील सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, चंदीगड महापौर निवडीवरून विरोधकांनी आता भाजपला टार्गेट करायला सुरूवात केलीय. पंतप्रधान मोदी डोळ्याला पट्टी बांधून बसलेत का, असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटानं केलाय. काहीही करून सत्ता मिळवण्याच्या खटाटोपातून हा प्रकार घडल्याचं मानलं जातंय. जगातली सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक मिरवणा-या देशातच लोकशाहीची झालेली ही थट्टा भूषणावह नाही...