पाकिस्तान नौदलाच्या भारताविरुद्धच्या दाव्याची पोलखोल
सागरी मार्गाने दहशतवादी होण्याची शक्यता भारतीय नौदल प्रमुखांनी वर्तवली होती.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नौदलाने इस्लामाबादमध्ये एक खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या सागरी सीमेत भारताच्या पाणबुड्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा भारताकडून फेटाळण्यात आला आहे. मंगळवारी पाकिस्तानने हा दावा केला होता. पण, त्यांच्याकडून दाखवण्यात येणारा व्हिडिओ हा १८ नोव्हेंबर २०१६ चा असल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे.
काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादाच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या चर्चांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच सागरी युद्धाचा मुद्दा प्रकाशझोतात आणण्यात आला आहे.
'पाकिस्तानी पाणबुडीच्या अद्ययावत कार्यप्रणालीमुळे सागरी हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाणबुडीला थांबवण्यात यश मिळवलं. शांततेच्या दृष्टीने पाकस्तानकडून उचलण्यात आलेलं पाऊल पाहता भारताच्या पाणबुडीवर निशाणा साधण्यात आला नाही', अशी माहिती पाकिस्तानच्या नौदलाच्या प्रवक्त्यांकडून एएनआय या वृत्तसंस्थेला देण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये १९७१ च्या युद्धाच्या वेळी सामना झाला होता. दरम्यान, भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सागरी मार्गानेही पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय पाणबुड्यांची घुसखोरी होत असल्याच्या मुद्द्याने साऱ्या जगाचच लक्ष वेधलं होतं.
भारताच्या नौदलाच्या हालचाली पाहता पाकिस्तान आपल्या राष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्याचं सांगण्यात येत आहे. १४ फेब्रुवारीला जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात करण्यात आलेल्या आत्घातील हल्ल्यानंतर भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडूनही या हल्ल्याचं उत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचं जाखवण्यासाठी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यानंतर या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणात वाढ झाली. या सर्व वातावरणात पाकिस्तानकडून भारतीय पाणबुडीने त्यांच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा दावाही करण्यात आला होता. दरम्यान, आरोप प्रत्याकरोपांच्या या सत्राची चर्चा जास्तचट रंगली. त्यातच भारती नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात सागरी मार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणात आणखी भर पडली आहे.