Anish Gawande: महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपल्या पुरोगामी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्याची प्रचिती देणारा एक निर्णय त्यांनी नुकताच घेतलाय. अनिश गवांडे या 27 वर्षीय तरुणाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.अनिश गवांडे हे राष्ट्रीय प्रवक्तेपद संभाळणारे देशातील पहिले समलिंगी तरुण ठरले आहे. एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या पिंक लिस्ट इंडिया संस्थेचे ते प्रमुख आहेत.त्यांनी कोलंबियाच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून तुलनात्मक साहित्यामध्ये पदवी मिळवली आहे.   राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदासाठी काम करणे ही माझ्याची रोमांचक संधी असल्याचे गवांडे यांनी यावेळी सांगितले. पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गावंडेंनी म्हटलंय. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. 


तरुणांना वैचारिक पर्याय



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षात उभी फूट पडली तरीही पक्षाने देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुन्हा उभे राहू शकतो, हे पक्षाने दाखवून दिले. गेल्या 10 वर्षात निर्माण झालेल्या गोंधळाला तोंड देण्याचे तसेच एक वैचारिक पर्यायही उपलब्ध करून देण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट करतोय. आमचा पक्षा नवीन राजकीय कल्पनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय. 


कितवी शिकले अनिश गावंडे?


ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या गावंडे यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती. त्यांच्याकडे असलेल्या नेतृत्वगुण, मुद्दे मांडण्याचे कौशल्य, अभ्यास यामुळे कमी वयात त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.  समलिंगी असल्याने मोठ्या राजकीय पक्षात स्थान मिळेल असे  मला कधीच वाटले नव्हते, असे त्यांनी सांगितले. युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. त्यांच्या या अनुभवाचा येथे ते फायदा करुन घेणार आहेत.


तिजोरी रिकामी करण्याचे काम


विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. राज्यात सत्ताबदल होऊ महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी खात्री असल्याचे यावेळी गवांडेंनी सांगितले. महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारश्याच्या विपरित सध्याची स्थिती आहे. महायुती सरकारकडून पैसे कसेही खर्च करुन राज्याची तिजोरी रिकामी केली जातेय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


पवार कुटुंबियांकडून प्रेरणा 


शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कामातून मी नेहमीच प्रेरणा घेत आलोय. 30 वर्षांपूर्वी पवार साहेबांनीच सर्वप्रथम महिला धोरण आणले होते. एलजीबीटीक्यू सेल असलेला हा एकमेव पक्ष आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा वारसा या पक्षात पुढे नेला जातो. समतेच्या मार्गावर चालत जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जात, वर्ग, लिंग, धर्म, लैंगिकता यांचा भेद न करता समानतेची हमी वागणूक देण्यावर पक्षाचा विश्वास आहे. यामुळे आपण शरद पवार गटात असल्याचे त्यांनी सांगितले.