India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून विविध राज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे (HeatWave) परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून, बिहारमध्ये आतापर्यंत 55, झारखंडमध्ये 5 आणि ओडिशामध्ये 41 तर महाराष्ट्रात (Maharashtra) उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.  तीव्र उष्मता लोकांसाठी जीवघेणी ठरत आहे. या कारणामुळे विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास 55 जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्या आलेला नाही. पण बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून जिल्ह्यांच्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा 50 हून अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू
उष्माघातामुळे देशात बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. जिल्ह्यांच्या आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये 16, भोजपुर 9, रोहतास 8, जहानाबाद 8, कैमूर 6, गया 3, बक्सर 3 आणि शेखपुरात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


ओडीशातही मृतांचा आकडा जास्त
भीषण उष्णतेचा कहर पश्चिम भारतातही पाहायला मिळतोय. ओडिशात उष्माघातामुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात सुंदरगढमध्ये 17, संबलपुर 8, झारसुगुडा 7, बोलनगीरमध्ये 6 लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. 


झारखंड आणि राजस्थानातही प्रकोप
झारखंड आणि राजस्थानातही सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय. झारखंडमध्ये उष्माघाताने 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. झारखंडच्या मेदिनीनगरमध्ये 47.4 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. तर गढवा जिल्ह्यात  47.1 डिग्री तापमान नोंदवलं गेलंय. याशिवाय राजस्थानमधल्या जयपूरमध्ये मृतांची संख्या 5 झाली आहे. 


महाराष्ट्रात 4 बळी
विदर्भात उष्माघाताने आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. उष्माघातामुळे यवतमाळमध्ये दोघांचा, बुलढाण्यात एकाचा मृत्यू आणि भंडाऱ्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला. बेलोरा इथल्या विद्या निलेश टेकाम चिमुकलीचा मृत्यू झाला. तर चिचमंडळ इथल्या दादाजी मारुती भुते असे 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तसंच बुलढाण्यातील संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचं नाव आहे.  


हवामान विभागाचा अंदाज
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असतानाच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ठराविक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याचाही अंदाज आहे. मुंबई, पालघर, ठाणे भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, दमट हवामान राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.