`कोरोना संकटात मोदी पंतप्रधान असणं भाग्यच`
`मोदींमध्ये प्रत्येक आव्हानावर विजय प्राप्त करण्याची क्षमता आहे`
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे देशात कोरोना व्हायरसचं मोठं संकट उद्धभवलं आहे. गेल्या सहा वर्षातील मोदी सरकार समोरचं हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटंलं आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील कोरोनाचं आव्हान आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान आहे. अशा संकटाच्या काळात भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे. हे भाग्यच असून मोदींमध्ये प्रत्येक आव्हानावर विजय प्राप्त करण्याची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील अनेक देश भारताच्या कोरोनाविरोधातील लढाईचं कौतुक करत असून यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं, असं राजनाथ सिंह म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटाच्या काळात समजूतीने निर्णय घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनचा निर्णय योग्यवेळी घेण्यात आला. कोरोनामुळे अमेरिकेची झालेली स्थिती सर्वांसमोर आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे आज भारताची परिस्थिती चांगली असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
मोदींच्या दूरदर्शी धोरणांनी देशाच्या लोकशाहीला नवीन दिशा दिली - जेपी नड्डा
लॉकडाऊनबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, या काळात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांसह लॉकडाऊनबाबत चर्चा केली असून गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. याबाबतचा निर्णय उद्यापर्यंत घेण्यात येणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.