नवी दिल्ली : कांद्याचा वाढता दर सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. परंतु आता अफगाणिस्तानमधील काबुलने भारताशी मैत्री निभावत, देशात कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या पश्चिम सीमेलगत असलेल्या पंजाबच्या विविध शहरांत गेल्या काही दिवसांपासून अफगाणी कांदा विकण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे देशात कांदा आयात होत असल्याचे सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानहून लवकरच ३० ते ३५ गाड्या कांदा देशात येणार आहे. भारतात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अफगाणिस्तान व्यापारी येथील बाजारात कांदा विक्रीसाठी उत्साहीत असल्याचे सांगितले. 


अमृतसर आणि लुधियानामध्ये अफगाणी कांदा ३० ते ३५ रुपये प्रति किलो विकला जात असल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.  भारतात पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानहून कांदा येण्याबाबत विचारले असता, कस्टम विभागातील एका अधिकाऱ्याने अफगाणिस्तानहून माल येण्यास कोणतीही बंदी नसल्याचे सांगितले.


दिल्लीतील आजादपूर बाजाराचे व्यापारी आणि कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले की, एक-दोन दिवसांत दिल्लीच्या बाजारात अफगाणी कांद्यांची आवक सुरु होणार असून कांद्याच्या किंमतीत कपात होण्याचीही शक्यता आहे.


कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामविसाल पासवान यांनी, मंगळवारी कांद्याच्या गैरव्यवहार प्रकरणी आणि नफेखोरीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 


देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पीकाचे नुकसान झाले आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. बाजारात आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे.