Google Maps Accident : देशात कुठेही प्रवास करायचा म्हटले की, सर्वात आधी गुगल मॅप ची मदत घेतली जाते. Google Map मुळे रस्ता माहीत नसला तरी, आपल्याला कमी वेळेत, अचूक जागेवर पोहोचता येतं. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. अनेकवेळा रस्ते माहीत असूनही आपण चुकतो आणि अशा वेळी गुगल मॅप (Google Map) कामी येतं. पण काही वेळा गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागातही पडू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल मॅपने दाखवला रस्ता आणि कार थेट नदीत
दक्षिण केरळातील (Kerala) कुरुप्पनथारा इथं चार पर्यटकांनी एका जागेवरुन दुसरीकडे जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला, पण यामुळे मोठा अपघात घडला. हैदराबादवरुन केरळात फिरण्यासाठी आलेला ग्रुप आपल्या कारसह थेट नदीत बुडाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटकांचा जीव वाचवण्यात आला, पण कार पाण्यात बुडाली. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. यात एका महिलेसह चार जणांचा जीव थोडक्यात बचावला.


चार जणांचा ग्रुप केरळात पर्यटन करत असताना ज्या रस्त्यावरुन ते प्रवास करत होते, त्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलं होतं. पर्यटक या ठिकाणी नवीन असल्याने त्यांना रस्त्यांची फारशी माहिती नव्हती. चुकू नये म्हणून त्यांनी आपल्या मोबाईलवर गूगल मॅप्स सुरु केला. गुगल मॅप्सने दाखवलेल्या रस्त्यावरुन ते पुढे जात होते, पण पुढे नदी असल्याचा त्यांना अंदाज आला नाही आणि कार सहित ते नदीत बुडाले.


चालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?
रस्त्यावर पाणी साचल्याने कार चालकाला अंदाज आला नाही. मुसळधार पाऊस असल्याने कार चालक 10 किमीच्या वेगाने कार चालवत होता. गुगल मॅप्सवर दिसत असलेल्या मार्गावरुन ते पुढे जात होते, पण काही अंतर पुढे गेल्यावर कार अचानक पाण्यात बुडू लागली. सुरुवातीला रस्त्यावर पाणी जास्त असल्याचं चालकाला वाटलं, पण कार पाण्यात आणखी खोल जाऊ लागल्यानंतर कारमधले सर्वजण घाबरले. सुदैवाने कारच्या काचा उघडल्या आणि चारही जणांनी खिडकीतून बाहेर पाण्यात उड्या मारल्या.


गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या ही गोष्ट नजरेस पडली, त्यांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने चारही जणांना नदीच्या बाहेर काढलं आणि त्यांचे जीव वाचवले. पण त्याची कार पाण्यात बुडाली. 


याआधीही झालीय अशी घटना
केरळात गुगल मॅप्समुळे अपघात झाल्याची ही पहिलीच घटना नाहीए. गेल्या वर्षी म्हणजे 2023 ऑक्टोबरला दोन तरुण डॉक्टरांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. प्रवासादरम्यान त्यांनी गुगल मॅप्सचा वापर केला. पण कारसहित ते नदीत बुडाले.