Foreign Policy of India : बांगलादेशसाठी 5 ऑगस्टचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला. बांगलादेशातील नागरिकांनी 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकली अन् शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद इतका पेटला की देशाची सत्ता उलथवून टाकण्यात आली. बांगलादेशच्या या हिंसाचारामागे चीन आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात होता, अशी टीका होताना दिसतीये. मात्र, बांगलादेशमधील संघर्ष हा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील आर्थिक परिस्थितीत बिघडत असताना दुसरीकडे शेजारी देशांशी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडत चालले आहेत. त्यामुळे आता भारत चहुबाजूने घेरला जात असल्याचं दिसतंय. एकीकडे पाकिस्तानची डोकेदुखी, तर काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेली सत्तापालट... त्यामुळे अरबी समुद्रातून भारताला चीनचा विळखा पडला आहे. एवढंच नाही तर मालदीवसोबत देखील भारताने पंगा घेतला आहे. त्यातच आता बांगलादेशमध्ये उद्भवलेली परिस्थिती भारतासाठी नक्कीच डोकेदुखीची ठरू शकते. गेल्या दशकापासून चीन भारताभोवती फास आवळत असताना परराष्ट्र धोरण चुकतंय का? असा प्रश्न अनेकांना पडताना दिसतोय.


पाच वर्षे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले एस जयशंकर दुसऱ्यांदा या पदावर कायम राहिले आहेत. गेल्या पाच वर्षात भारताने आपले पाच मित्र देश गमावले. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशही दहशतवाद्यांचे अड्डे बनू शकते आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये घुसखोरीची समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती आहे. त्यासाठी आता भारत कोणत्या आघाडीवर काम करतंय? याची स्पष्टता नाही.


परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात...


भारत आणि बांगलादेश यांचे दृढ संबंध राहिले आहेत. आमची बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारतीय सीमेवरही अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या सार्वजनिक निवडणुका आटोपताच विरोधांची ही मालिका सुरू झाली, असं जयशंकर यांनी म्हटलं होतं. एस. जयशंकर यांनी यावेळी बांगलादेशमधील हिंदू लोकांची व्यस्था मांडली पण भारताचं परराष्ट्र धोरण स्पष्ट केलं नाही. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाची संकेत स्पष्ट होत नाहीत, असं चित्र समोर येत आहेत. 


चीनची नापाक चाल


श्रीलंकेवर चीनने आपली पकड मजबूत केली असताना चीन पाकिस्तानमध्ये देखील आपली पायमुळं रोवत आहे. तर नेपाळशी संबंध सुरुवातीसारखे चांगले राहिले नाहीत. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर त्या देशाशी असलेल्या संबंधांवरही परिणाम झालाय. अशातच आता बांगलादेश देखील डोकं वर काढतोय. त्यामुळे भारत चहुबाजूने घेरला गेलाय, असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. अशातच परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर शेजारी देशांशी चांगले संबंध निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहे.