`आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास` 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Surat News : ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तोच मुलगा मोठेपणी आपल्या स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडून देत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलाच्या विरहात आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
Surat News : आपल्या मुलाने चांगलं शिकाव, मोठा माणसून व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी प्रत्येक आई-वडिल अहोरात्र कष्ट करतात, पण आपल्या मुलाचे लाड पूर्ण करतात. पण काही वेळी त्याच मुलांना मोठं झाल्यावर आपल्या आई-वडिलांचं ओझं वाटायला लागतं. अशीच काहीशी मन सुन्न करणारी घटना गुजरातमधल्या सूरतमध्ये समोर आली आहे. फायनान्सचा व्यवसाय करणारा मुलगा कर्जबाजारी झाला. मुलाच्या मदतीला त्याचे वडिल धावून आले. ओळखी-पाळखीच्या लोकांकडून पैसे उधार घेत वडिलांनी मुलाचं सर्व कर्ज फेडलं आणि मुलाला कॅनडाला पाठवलं. तिथे नोकरी करून तो चांगली कमाई करेल असं स्वप्न आई-वडिलांनी पाहिलं होतं. पण कॅनडाला गेल्यानंतर मुलगा आई-वडिलांना कायमचा विसरुन गेला.
कधी आठवण आल्यावर आई-वडिलांनी फोन केल्यास तो त्यांच्याशी बोलणं टाळू लागला. याचं त्याच्या आई-वडिलांना प्रचंड दु:ख होतं. अखेर मुलाचा विरह सहन न झाल्याने आई-वडिलांनी राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यू आधी त्यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्याने आपली दु:खद कहाणी मांडली होती. पोलिसांच्या हाती ही सुसाईड नोट लागली असून या दिशेने त्यांनी तपास सुरु केला आहे.
काय आह नेमकी घटना?
सूरतच्या सारथना परिसरातील मीरा एव्हेन्यू इमारतीत 66 वर्षांचे चूनीभाई गेडिया आणि 64 वर्षांच्या मुक्ताबेन गेडिया राहत होते. बुधवारी त्यांनी आपल्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मृत चुनीभाई गेडिया यांचा मुलगा पीयूष चार वर्षांपूर्वी फायनान्सच्या व्यापारात कर्जबाजारी झाला होता. त्याच्यावर 40 लाखांचं कर्ज होतं. मुलासाठी चूनीभाई काही ओळखींच्या लोकांकडून पैसै उधारीवर घेत मुलाचं कर्ज फेडलं. इतकंच नाही तर त्याला चांगली नोकरी मिळावी यासाठी पियूषला कॅनडाला पाठवलं.
मुलाचं कर्ज आणि कॅनडा पाठवण्याच्या खर्चामुळे स्वत: चूनीभाई कर्जबाजारी झाले होते. पण कॅनडा स्थायिक झाल्यानंतर पियूषने आई-वडिलांना विचारणच सोडून दिलं. आपल्या आई-वडिलांना तो कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर फोनवर बोलण्यासही तो टाळाटाळ करत असे. मुलाच्या अशा वागण्याने चूनभाई आणि मुक्ताबेन चिंतेत होते.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेलं?
चूनीभाई आणि मुक्ताबेन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलाच्या नावाने एक चार पानी पत्र लिहिलं. त्यात त्याने मुलगा पियूषचे आभार व्यक्त करत आपल्या अंतिम संस्कार कोणताही खर्च करु नये असं आव्हान केलं होतं. चूनीभाई यांनी आपल्या पत्राक कर्जाचाही उल्लेख केलाय. आपल्यावर 40 लाखांचं कर्ज झालंय. ते कर्ज चुकवू शकत नाही. माझं वय आता 66 इतकं आहे, त्यामुळ मी नोकरी करु शकत नाही, किंवा कोणता कामधंदाही करु शकत नाही. कोणताच पर्याय उरला नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलालं लागत असल्याचं त्यांनी पत्रात नमुद केलंय.
आमचा मुलगा पियुषमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. पियूषवर कर्ज होतं. त्याचं कर्ज चुकवण्यासाठी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले, होती नव्हती ती सर्व बचतही दिली. व्याज्यावर पैसे घेतले. पण गेली चार वर्ष तो कॅनडाला राहात आहे, यादरम्यान त्याने एकदाही कॉल केला नाही. आम्ही फोन केला की तो उचलत नाही. माझ्या नातेवाईक-मित्रांकडून मी पैसे घेतले होते, पण त्यांना परत करु शकत नाही, आता याची लाज वाटायला लागली आहे, असं चूनीभाई यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं.