India : आताची मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर, गोव, जयपूरसह देशातील अनेक विमानतळं (Airports) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat Email) देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. नागपूर विमानतळाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धमकीचा ईमेल विमानतळाचे डायरेक्टर आबिद रुई यांच्या मेल आयडीवर सकाळी पाठवण्यात आला. धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ याची माहिती सर्व विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी हे प्रकरणी गांभीर्याने घेतलं असून हा एक बोगस ईमेल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईमेल कोणी आणि कोणत्या ईमेल आयडीवरुन पाठवण्यात आला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. तसंच धमकीचा ईमेल पाठवण्यामागे काय उद्देश होता याचाही शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धमकीचा ईमेल पाठवून दहशत पसरवण्याचा उद्देश असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वी कोलकाता आणि देशातील काही विमानतळांनाही अशा प्रकारे धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. हे ईमेल बोगस असल्याचंही निष्पन्न झालं होतं. 


गोव्याच्या डाबोलिम विमानतळाच्या अधिकाऱ्यांनाही ईमेलवर बॉम्बने विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. विमानतळ व्यवस्थापनाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून बॉम्ब स्कॉडकडून विमातळाची कसून तपासणी करण्यात आली. तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानतळाचे निदेशक एसवीटी धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार ईमेल बोगस असलातरी अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यामुळे विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनालाही सोमवारी सकाळी धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. ईमेल प्राप्त झाल्यानतंर तात्काळ शोधमोहिम राबवण्यात आली. पण यात संशयास्पद काहीही आढळलं नाही. धमकीचा ईमेल कोणी पाठवलाय याचा शोध घेण्यासाठी विविध राज्यात पोलिसांचा पथक पाठवण्यात आलं आहे. ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचीची मदत घेण्यात येत आहे.