मनीष रामदेव, झी २४ तास, जैसलमेर : पाकिस्तानी सीमेलगत राजस्थानात जैलसमेरजवळ आर्मी आणि एअरफोर्सने संयुक्त युद्धसराव केला. लष्कराने आणि वायुदलाने आपापली मारकक्षमता तावून सुलाखून घेतली. राजस्थानातलं थरचं वाळवंट लष्कराच्या शक्तिप्रदर्शनाने थरारलं. पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या या युद्धसरावाने पाकिस्तानलाही कानठळ्या बसल्या असतील. भारताच्या सामर्थ्याने चीन, पाकिस्तानचीही झोप उडाली असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोखरणच्या फिल्ड फायरिंग रेंजवर रविवारपासून संयुक्त युद्धसरावाला सुरूवात झालीय. लष्कराच्या सुदर्शन चक्र वाहिनी आणि वायुदलाने आपली ताकद आजमावली. 



वायुदलाच्या तोफखान्याने यावेळी आपली शक्ती दाखवून दिली. भारताच्या बोफोर्स, के ९ वज्र, १३० आर्टिलरी गन यांनी धडाकेबाजा माऱ्याचा सराव केला. 


भारतीय लष्करात गेल्याच वर्षी दाखल झालेल्या के ९ वज्रचा मारा पाहणं फारच रोमांचक होतं.


तर कारगिल युद्धात विजय प्राप्त करून देणारी आणि दोनच दिवसांपूर्वी तंगधारमध्ये पाकिस्तानी सीमेवर गरजणाऱ्या बोफोर्स तोफेचा सराव लक्षवेधी होता. 



मल्टी बॅरल रॉकेट लाँचरच्या धडाक्याने तर कमाल केली. आपली सर्व काल्पनिक लक्ष्य टिपताना प्रत्यक्ष युद्धात काय उत्तम कामगिरी होऊ शकते याची चुणूकच त्यांनी दाखवली


यावेळी लष्कराच्या ताफ्यात दाखल झालेल्या लढाऊ हेलिकॉप्टर्सनी आणि वायुसेनेच्या सर्वच लढाऊ विमानांनी अचूक लक्ष्यवेध केला.