Election Commission : निवडणूक आयोगाने आज तीन राष्ट्रीय पक्ष आणि दोन प्रादेशिक पक्षांचा दर्जा रद्द केला आहे तर एका पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झालेल्या पक्षांत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), तृणमुल काँग्रेस (TMC) आणि भारतीय कम्यूनिस्ट पक्ष (CPI) यांचा समावेश आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (AAP) आत राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय भारत राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय लोक दल (BRS) या प्रादेशिक पक्षांचा दर्जाही (RLD) रद्द करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्जा का रद्द केला?
निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार ज्या पक्षांचा दर्जा रद्द करण्यात आला आहे, त्या पक्षांना देशभरात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.  या पक्षांन 2 लोकसभा निवडणुका आणि 21 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. या निवडणुकांमधील कामगिरीच्या आधारावर या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला.  मात्र, पुढील निवडणुकीत या पक्षांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो.


आप आता राष्ट्रीय पक्ष
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने दिल्लीत सत्ता काबीज केली. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आप पंजाबमध्येही सत्तेत आली. गोव्यात आपने 6.77 टक्के मतं मिळवत दोन जागांवर विजय मिळवला. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपला फारसं यश मिळवता आलं नसलं तरी गुजरातमध्ये आपने 14 टक्के मतं मिळवली. त्यामुळे दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप हा प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. 


आपची 10 वर्षातली कामगिरी
2002 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली. या 10 वर्षात आपने दोन राज्यात सत्ता स्थापन केली. दिल्ली महानगर पालिका निवडणुकीतही आपने भाजपच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत पालिकेवर झेंडा फडकावला. याशिवाय गोवा विधानसभेत 2 तर गुजरात विधानसभेत 6 जागा जिंकल्या. त्यामुळे आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याचे निकष पूर्ण केले. 


काय आहेत राष्ट्रीय पक्षाचे निकष
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काही निकष असतात. त्या पक्षाचे किमान 4 खासदार असावेत. तसंच 6 टक्के मतं मिळणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत किमान चार राज्यात सहा टक्के मत मिळवलेली असावीत. किंवा चार राज्यात 2 विधानसभा जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. आपने दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे तर गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी पार केली आहे. 


देशात किती राष्ट्रीय पक्ष
देशात आतापर्यंत आता 5 राष्ट्रीय पक्ष आहेत. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, आप, सीपीएम  यांचा समावेश आहे.