पाकिस्तानपेक्षाही भारतातली परिस्थिती बिकट, अन्नासाठी भारतीयांची धडपड
कित्येक भारतीयांना झोपावं लागतंय उपाशी
जागतिक स्तरावर भारतासाठी (India) वाईट बातमी समोर आलीय. जागतिक भूक निर्देशांकांत (ग्लोबल हंगर इंडेक्स 2022) यादीमध्ये भारत 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आहे. जागतिक यादीत दक्षिण आशियाई देशांपैकी भारत हा युद्धग्रस्त अफगाणिस्तानपेक्षा सरस आहे. आर्थिक संकट आणि उपासमारीचा सामना करत असलेले पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) हे देश भारताच्या तुलनेत अधिक चांगल्या क्रमवारीत (Global Hunger Index 2022) असल्याचे अहवालातून समोर आलं आहे. दक्षिण आशियातील फक्त अफगाणिस्तान हा भारताच्या खाली असलेला एकमेव देश आहे. याआधीही 2021 मध्ये भारताची क्रमवारी खूपच मागे असल्याचे समोर आलं होतं. त्यावेळी सरकारने हे आकडे फेटाळले होते.
2022 चा जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index 2022) अहवालानुसार भारताचे शेजारी पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. 121 देशांच्या यादीतबाबत भारत 107 व्या स्थानावर आहे, तर शेजारी देश पाकिस्तान 99 व्या स्थानावर आहे. या यादीत दक्षिण आशियातील सर्वोत्तम स्थानावर असलेला देश श्रीलंका आहे. आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या श्रीलंकेला या निर्देशांकात 64 वे स्थान मिळाले आहे. भारताचा शेजारी देश नेपाळ (Nepal) 81व्या तर बांगलादेश (Bangladesh) 84व्या स्थानावर आहे.
जागतिक भूक निर्देशांक 2022 च्या यादीत भारत खूप खालच्या क्रमांकावर आहे. 121 देशांच्या यादीत भारत 107 व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारताला 101 क्रमांक देण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट भारताशेजारील हे सर्व देश भारताच्या वर आहेत. मात्र, आतापर्यंत जागतिक निर्देशांकाच्या यादीवर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, विनाशकारी पुरानंतर भीषण महागाई आणि उपासमारीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची स्थिती भारताच्या तुलनेत चांगली असल्याचे दिसून येत आहे, हे आश्चर्यकारक आहे.
जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index) म्हणजे काय?
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मापन करण्याची पद्धत आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स आकडेवारीनुसार, कुपोषण, अर्भकांचे कुपोषण, खुंटलेली वाढ आणि बालमृत्यू या चार निर्देशकांच्या मूल्यांवर मोजला जातो. ग्लोबल हंगर इंडेक्सचे एकूण 100 गुण आहेत, ज्याच्या आधारे देशाच्या भुकेच्या तीव्रतेची स्थिती दर्शविली जाते. म्हणजेच एखाद्या देशाचा स्कोअर शून्य असेल तर तो चांगल्या स्थितीत आहे आणि जर एखाद्याचा स्कोअर 100 असेल तर तो अत्यंत वाईट स्थितीत आहे. भारताचा स्कोअर 29.1 आहे जो अत्यंत गंभीर प्रकारात मोडतो.