President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहे. आपला देश हा स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे. हा एक परिवर्तनाचा काळ आहे. प्रजासत्ताक दिन हा आपली मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. जवळपास 140 कोटींहून अधिक भारतीय एक कुटुंब म्हणून एकत्र येतात. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात, ही खूप आनंदाची बाब आहे", असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले. 


अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचाही उल्लेख


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी राम मंदिराची उभारणी, उद्घाटन आणि अभिषेक याबद्दल उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "अयोध्येत प्रभू श्री रामांच्या जन्मस्थानी उभारलेले भव्य मंदिर आपण पाहिले. त्या भव्य मंदिरात स्थापन झालेल्या रामाच्या मूर्तीचा झालेला अभिषेक आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना हा ऐतिहासिक सोहळाही आपण याची देही याची डोळा पाहिला. जेव्हा भविष्यात या घटनेचा उल्लेख केला जाईल, तेव्हा इतिहासकार भारताचे नाव वारंवार घेतील." 


कर्पूरी ठाकूर यांना वाहिली श्रद्धांजली


त्याबरोबरच राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, "सामाजिक न्यायासाठी अविरत लढा देणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांचे जन्मशताब्दी पूर्ण झाले. कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांचे एक महान वकील होते, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी समर्पित केले. त्यांच्या योगदानाने अनेकांचे जीवन समृद्ध झाले, त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते", असे त्यांनी यावेळी म्हटले. 


जगात काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती


"आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. पण त्या काळात देशाच्या सुशासनासाठी आणि देशातील नागरिकांच्या क्षमता आणि कलागुणांना मुक्तपणे वाव देण्यासाठी योग्य मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरु होते. यानंतर मग संविधानाची निर्मिती झाली आणि आपल्या राष्ट्राचा, भारताच्या संविधानाचा महान ग्रंथ बनवला. त्यामुळे आजच्या दिवशी आपण त्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे कृतज्ञतेने स्मरण करावे, ज्यांनी आपल्या संविधान निर्मितीसाठी अमूल्य योगदान दिले. गेल्या काही काळात जगात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी हिंसाचारही पाहायला मिळाला", असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.


G20 शिखर परिषदेमुळे भारताला प्रोत्साहन


"गेल्या प्रजासत्ताक दिनापासून आतापर्यंतचे एक वर्ष पाहिले तर आपल्या प्रचंड कौतुक वाटेल. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत G20 शिखर परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. ही एक खूप मोठी कामगिरी होती. या कार्यक्रमात अनेक सर्वसामान्य व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यावेळी मिळालेल्या सूचना या फारच महत्त्वाच्या होत्या. या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा गहन आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सहभागी केले जाऊ शकते, याचा आम्ही अनुभव घेतला. G20 शिखर परिषदेमुळे भारताच्या उदयास प्रोत्साहन मिळाले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही यामुळे कौतुक झाले", असेही त्यांनी सांगितले