नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवार 13 ऑगस्ट रोजी, सर्वात दीर्घकाळापर्यंत पदावर राहणारे देशाचे चौथे पंतप्रधान बनले आहेत. त्यासह एक बिगर कॉंग्रेस नेते म्हणून त्यांनी देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता. अटल बिहारी वाजपेयी आपला सर्व कार्यकाळ मिळून 2,268 दिवसांपर्यंत पंतप्रधान होते. 13 ऑगस्ट रोजी मोदींनी हा रेकॉर्ड मोडून आपल्या नावे केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यावर्षी सलग सातव्या वेळी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार आहेत. बिगर-कॉंग्रेस नेते म्हणूनही ही एक अनोखी नोंद असेल.


भारतीय राजकारणात सर्वात प्रदीर्घ काळापर्यंत पंतप्रधान पदी असण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावे आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 27 मे 1964 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. ते एकूण 16 वर्ष 286 दिवसांपर्यंत पंतप्रधान होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत एकूण 14 पंतप्रधान झाले आहेत.


पंडित नेहरुंनंतर इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. त्यानंतर चौथ्या स्थानी भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे हा रेकॉर्ड होता. त्यांनी जवळपास साडे सहा वर्षे पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. पंतप्रधान मोदींनी आता हा रेकॉर्ड मोडला आहे.


पंतप्रधान मोदींनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे सर्वात प्रदीर्घ मुख्यमंत्री असल्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावे आहे.