नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर खाली करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. गिलिगीत-बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने अवैधरित्या या भागावर केलेला कब्जा लगेच सोडून द्यावा, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने गिलिगीत-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विरोध केला आहे. याबाबत नवी दिल्लीने इस्लामाबादकडे तक्रारही केली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच आपल्या आदेशात निवडणुका घेण्यासाठी 'गव्हर्मेंट ऑफ गिलिगीत बाल्टिस्तान ऑर्डर'मध्ये संशोधन करायला परवानगी दिली. 


भारताने याबाबत पाकिस्तानला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख गिलीगीत आणि बाल्टिस्तान भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे.पाकिस्तानी सरकार किंवा न्यायालयांना भारताच्या अंतर्गत भागात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानने अवैधरित्या यावर कब्जा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बदल करण्याला आमचा तीव्र विरोध आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला लिहिलेल्या पत्रात म्हणलं आहे.