भारतात कोरोनाचा वाढता कहर : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक रूग्ण
अमेरिका, ब्राझीलला देखील टाकलं मागे
मुंबई : भारतात ऑगस्ट महिन्यात जगातील सर्वाधिक कोविड-१९ चे हॉटस्पॉट समोर येत आहेत. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सर्वाधिक रूग्ण आढळल्याचे समोर आले आहे. यावेळी अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा जगातील तिसऱ्या क्रमांकावर भारताला घेऊन गेला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस आता देशभरात पसरला आहे. शुक्रवारी कोरोनाचे भारतात ६० हजार रूग्ण समोर आले. ९२६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात ऑगस्ट महिन्यात गेल्या सहा दिवसांत ३,२८,९०३ कोरोनाचे नवीन रूग्ण समोर आळे आहेत. अमेरिकेत हा आकडा ३,२६,१११ आणि ब्राझीलमध्ये २,५१,२६४ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत.
२,३,५ आणि ६ ऑगस्टच्या दिवशी भारतात सर्वाधिक रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी भारतात २० लाखाचा आकडा पार केला. भारतात कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. भारतात संक्रमण हे ३.१% आहे जे अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वाधिक आहे.
पण कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा पाहिला तर तो अमेरिका आणि ब्राझीलमध्ये भारतापेक्षा सर्वाधिक आहे. ब्राझील, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा हा ६००० इतका आहे तर भारतात ५,०७५ रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. तर ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १४ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.