गेल्या काही दिवसांपासून कॅनडात (Canada) भारतीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी केलेल्या एक व्यक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. खलिस्तानी (Khalistan) नेता हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. खलिस्तान समर्थक निज्जर याची 18 जून रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्या हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे भारताने (MEA) या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपली चिंता व्यक्त केली आहे, असे ट्रूडो म्हणाले. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरही मांडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राजधानी दिल्लीत झालेल्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. ट्रुडो यांच्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते काही दिवस भारतातच थांबले होते. त्यानंतर कॅनडाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती.


काय म्हणाले जस्टिन ट्रूडो?


कायमच भारताविरोधी भूमिका घेणारे ट्रूडो यांच्या संसदेतील वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका केली जातेय. "कॅनडाची तपास यंत्रणा भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या आरोपांची चौकशी करत आहेत. कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. तसेच हे पूर्णपणे अस्वीकार्य असून मूलभूत नियमांच्या विरुद्ध आहे," असे जस्टिन ट्रूडो म्हणाले.


भारताने दिलं प्रत्युत्तर


भारत सरकारने ट्रुडो यांचे हे वक्तव्य फेटाळून लावले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रूडो यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आहे. अशा निराधार आरोपांमुळे कॅनडात आश्रय देण्यात आलेल्या आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विषयावर कॅनडाच्या सरकारची निष्क्रियता ही दीर्घकाळापासून आणि सतत चिंतेची बाब आहे. कॅनडाच्या राजकीय व्यक्तींकडून अशा लोकांबद्दल उघडपणे सहानुभूती व्यक्त करणे तीव्र चिंतेची बाब आहे. कॅनडात खून, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यासह बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना आश्रय देणे हे नवीन नाही. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांवर केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळून लावले होते. कायद्याच्या राज्यासाठी दृढ वचनबद्ध असलेला आपला लोकशाहीचा देश आहे," अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 


कोण होता हरदीपसिंग निज्जर?


दरम्यान, भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो गेली अनेक वर्षे कॅनडात राहत होता आणि भारताविरुद्धच्या कारवाईसाठी खतपाणी घालत होता. निज्जर गेल्या वर्षभरात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या लोकांना पैसा पुरवत होता. 2018 मध्ये जेव्हा ट्रुडो भारत भेटीवर आले होते त्यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी दिली होती, ज्यामध्ये निज्जर याच्या नावाचाही समावेश होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.