मोठी बातमी: एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या `या` कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा
या हल्ल्याने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाला आहे. याशिवाय, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर यांचा समावेश असल्याचे समजते.
भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर असणाऱ्या २०० एके रायफल, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर हा सर्व शस्त्रसाठा उद्ध्वस्त झाला.
या हल्ल्यानंतर 'जैश'च्या तळावर नेमके किती नुकसान झालेले आहे, याचा अंदाज आलेला नाही. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून हळुहळू ही माहिती सरकारला पुरवली जात आहे. यामध्ये घटनास्थळावरील काही छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामध्ये 'जैश'च्या तळावरील इमारतीच्या पायऱ्यांवर अमेरिका, इंग्लंड आणि इस्त्रायलचा राष्ट्रध्वज चितारलेला दिसत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक आणखीनच कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे.