नवी दिल्ली : मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात एक मोठी कारवाई करण्यात आली. पुलवामा हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणू भारताकडून ही कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महत्त्वाच्या तळांना निशाणा करण्यात आलं. मिराज २००० या लढाऊ विमानांच्या मदतीने भारतीय वायुदलाने ही कारवाई केली. ज्यामध्ये जवळपास दोनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांचे कंट्रोल रुम्सही उध्वस्त करण्यात आले आहेत. भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईविषयी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव वियज गोखले यांनी या कारवाईविषयीची अधिकृत माहिती दिली. मंगळवारीच मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ही अधिकृत माहिती देण्यात आली. 
वायुदलाने केलेल्या या कारवाईत दहशतवादी तळांवर उपस्थित असणाऱे जैशचे दहशतवादी, सिनियर कमांडर आणि फिदायीन यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात बालाकोट येथील जैशच्या तळाचा प्रमुख मौलाना युसूफ अजहर म्हणजे उस्ताद घौरी यालाही कंठस्नान घातलं. घौरी हा जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा असल्याची अधिकृत माहितीही देण्यात आली आहे. 


भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये फक्त दहशतवादी तळांनाच निशाणा करण्यात आलं असून, स्थानिक जनतेला यामुळे कोणत्याही प्रकारची हानी पोहोतचणार नाही याविषयीची काळजीही घेण्यात आली होती. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात उसळलेली संतापाची लाट पाहता अखेर दहशतवादाशी लढा देत भारताकडून हे पाऊल उचलण्यात आलं. 



वायुदलाचा ताफा पाहून पाकिस्तानची घबराट 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वायुदलाकडून सुरु झालेली ही कारवाई पाहता पाकिस्तानच्या वायुदलाची घबराट झाल्याचंही वृत्त समोर आलं. पाकिस्तानी सैन्याच्या एफ १६ चा पळपुटेपणा जगासमोर हल्ल्याला तोंड देण्याऐवजी पाकिस्तानची एफ १६ विमानं पळून गेली. मिराज विमानांची संख्या पाहूनच पाकिस्तानी विमानांनी माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.