नवी दिल्ली: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ शुक्रवारी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर के-४ या अणू क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. के-४ हे अंडरवॉटर क्षेपणास्त्र असून त्यासाठी पाण्याखाली प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. स्वदेशी बनावटीच्या अरिहंत श्रेणीतील अणू पाणबुड्यांसाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जाते. के-४ हे क्षेपणास्त्र ३ हजार ५०० किमी अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्याच महिन्यात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. शुक्रवारी होणाऱ्या चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्रातील अद्ययावत प्रणालीची तपासणी केली जाईल, असे 'डीआरडीओ'कडून सांगण्यात आले. तुर्तास पाण्याखाली तात्पुरता प्लॅटफॉर्म तयार करून ही चाचणी होईल. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे सज्ज झाल्यानंतरच पाणबुडीतून त्याचे लाँचिंग केले जाईल. 



याशिवाय, 'डीआरडीओ'कडून बीओ-५ हे आणखी एक क्षेपणास्त्र विकसित केले जात आहे. या क्षेपणास्त्रात ७०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता असेल. येत्या काही दिवसांमध्ये डीआरडीओ अग्नी-३ आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्राचीही चाचणी करणार आहे.