कोहली पहिल्या क्रमांकाचा फलंदाज का आहे, हे मला तेव्हा उमगलं- जेम्स अँडरसन
विराट कोहलीसमोर गोलंदाजी करताना तुमची कसोटी लागते.
लंडन: लॉर्डसवरील कसोटीत भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लिश गोलंदाजांच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा डाव १०७ धावांमध्ये ढेपाळला. जेम्स अँडरसनने २० धावांत पाच बळी टिपून यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. विराट कोहली आणि आर. अश्विन यांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर फारसा टिकाव धरु शकला नाही.
दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अँडरसनने विराटच्या खेळीच कौतुक केले. विराट कोहलीशी सामना करायला मला नेहमीच आवडते. एकीकडे आऊट स्विंगरवर भारतीय फलंदाज तंबूत परतत असताना विराट कोहली कट लागून बाद का होत नाही, याचा विचार माझ्या डोक्यात सतत घोळत होता. मात्र, त्यावेळी मी या स्पर्धेचा आनंद घेत होतो.
तो जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असण्यापाठी काहीतरी कारण आहे. मलाही जगातील सर्वोत्तम फलंदाजांचा सामना करायला आवडते. त्यांच्यासमोर गोलंदाजी करताना तुमची कसोटी लागते आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ ठरु शकता का, हे जोखूनही पाहता येते. हे सर्व खूपच थरारक असते. दुर्दैवाने विराट कोहलीने अजूनपर्यंत त्याचा सर्वोत्तम फॉर्म दाखवलेला नाही. परंतु, मी या संपूर्ण मालिकेत अधिकाअधिक प्रयत्न करणार असल्याचे अँडरसनने सांगितले.