India Weather Update : मार्च महिन्याची अखेरही अवकाळी पावसानंच होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. आजही अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पश्चिम हिमालयातील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, बुधवारी सायंकाळपासून वादळाला सुरुवात झाली असून यामुळे तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. आजही अनेक भागात ढगाळ वातावरण असेल आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


या राज्यांमध्ये आज पाऊस पडेल


महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही गारपीट होऊ शकते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना इतर पिकांसह गहू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


मुंबई आणि कोकणात ढगाळ वातावरण 


विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मुंबई आणि कोकणात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या इशाऱ्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मात्र स्वच्छ आणि कोरडे वातावरण असेल. यापावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याआधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.


अनेक भागात पावसासह गारपीट होण्याची शक्यता


 31 मार्च रोजी तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारी भाग, रायलसीमा आणि कर्नाटकच्या अनेक भागात पावसासह गारपीट होऊ शकते. उत्तर-पश्चिम भारतात गेल्या आठवड्यातही पाऊस आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गारपीट झाली. ढगाळ वातावरण आणि पावसाचा हा कालावधी 5 एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या बदलत्या वातावरणामुळे डास आणि माश्यांचा प्रादुर्भाव वाढलाय. सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या गोष्टींचे खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.