भारताला कधी मिळणार कोरोनाची लस? आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलं उत्तर
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनाची लस कधी येणार?
नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनाची लस कधी येणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. देशाचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सगळं काही व्यवस्थित झालं, तर भारताला २०२० वर्षाच्या अखेरीस कोरोनाची लस मिळेल, असं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.
'जगातला प्रत्येक देश कोरोना व्हायरसची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात सध्या २६ लशींची चाचणी सुरू आहे, तर १३९ लसी या चाचणीच्या आधीच्या प्रक्रियेत आहेत. भारतात सध्या ६ लशींवर काम सुरू असून त्यातल्या तीन लशी या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत,' असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे.
भारतातल्या लशींची प्रगती बघता मानवी चाचण्या संपल्यानंतर वर्षाच्या अखेरीस आपल्याला कोरोनाची लस मिळेल, असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. एकदा प्रभावी लस मिळाली, की आपण तिच्या उत्पादनाला आणि वितरणाला सुरूवात करू, असंही हर्ष वर्धन म्हणाले.
भारतामध्ये आता आपण एका दिवशी १० लाख कोरोनाच्या टेस्टही घेऊ शकतो. रुग्ण बरे होण्याचा दर आता ९ टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसंच मृत्यूदर १ टक्क्यापर्यंत कमी करण्याचं आमचं लक्ष्य आहे, अशी प्रतिक्रिया हर्ष वर्धन यांनी दिली.
देशभरात रविवारी २४ तासात ६९,२३९ कोरोना रुग्णांची वाढ झाली, यामुळे देशभरातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३० लाखांच्यापुढे गेला आहे. २४ तासांमध्ये ९१२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या ५६,७०६ एवढी झाली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ३०,४४,९४० एवढी झाली आहे, यापैकी ७,०७,६६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २२ लाख रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.