नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायूदलाच्या AN-32 या विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भारतीय वायूदलाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. मृतांमध्ये जी.एम. चार्ल्स, एच. विनोद, आर. थापा, ए. तन्वर, एस. मोहंती, एम.के गर्ग, के.के. मिश्रा, अनुप कुमार, शेरीन, एस.के. सिंग, पंकज, पुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे. भारतीय वायूदलाने या सर्वांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. 




३ जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून AN-32 विमानाने उड्डाण केले होते. हे विमान अरूणचालमधील मेंचुका येथे उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर काहीवेळातच हे विमान रडारवरून गायब झाले. अत्यंत दुर्गम परिसर असल्याने या तब्बल आठ दिवस या विमानाची कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. अखेर एका स्थानिकाच्या माहितीवरून राबवण्यात आलेल्या शोध मोहीमेवेळी लिपोपासून १६ किलोमीटर अंतरावर मंगळवारी AN-32 चे अवशेष मिळाले होते. पण उंचावरील प्रदेश आणि घनदाट जंगल भागामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग करणे शक्य झाले नाही. १२ हजार फूट उंचीवर लिपो या छोटयाशा गावाजवळ हे अवशेष आढळले असून त्या गावाची लोकसंख्या फक्त १२० आहे. हे अवशेष दिसल्यानंतर लँडिंग करणे शक्य झाले नव्हते. अखेर आज सकाळी १५ जणांचे शोध पथक या जागेवर उतरवण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर विमानातील एकही जण जिवंत नसल्याचे स्पष्ट झाले. विमानातील १३ जणांमध्ये वायूदलाचे अधिकारी, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता.