लवकरच कॉकपिटमध्ये परतायचंय, अभिनंदन यांचा उत्साह कायम
मला तात्काळ पुन्हा एकदा विमान उडवण्यास सुरूवात करायची आहे असे अभिनंदन यांनी सांगितले.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान पाडून त्यानंतर 60 तास 'पाक'मध्ये राहून परतल्यानंतरही अभिनंदन यांचा उत्साह कायम आहे. पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडून त्यांनी देशवासियांच्या मनात घर केले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही त्यांच्या धैर्याचे कौतुक करावे अशीच कामगिरी त्यांनी केली. या घटनेला दोन दिवस उलटले नसतानाही पुन्हा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी या संदर्भात ही माहिती दिली.
अभिनंदन यांच्यावर दोन दिवसांपासून लष्कराच्या रिसर्च ऍण्ड रेफरल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. मला तात्काळ पुन्हा एकदा विमान उडवण्यास सुरूवात करायची आहे असे अभिनंदन यांनी वायुसेनेचे वरिष्ठ कमांडर आणि उपचार करत असलेल्या डॉक्टरांना सांगितले. पाकिस्तानी वायुसेने सोबत झालेल्या संघर्षा दरम्यान एफ 16 लढाऊ विमान पाडणारे ते पहिले भारतीय पायलट ठरले होते.
या दरम्यान त्यांचे मिग 21 हे विमानदेखील पाडण्यात आले. त्यानंतर पॅराशूटच्या सहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या अभिनंदन यांना पाकिस्तान सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. शुक्रवारी रात्री ते वाघा बॉर्डवरून ते भारतात पोहोचले आणि संपूर्ण देशाने त्यांचे स्वागत केले. हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांचा एक चमू अभिनंदन यांच्या आरोग्य स्थितीची देखरेख करत आहे. अभिनंदन हे लवकरच कॉकपिटमध्ये परततील असे एका सैन्य अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानकडून मानसिक छळ होऊनही अभिनंदन यांचा उत्साह खूप उंच आहे. ते शुक्रवारी रात्री 11.45 वाजता वायुसेनेच्या विमानाने राजधानीत पोहोचले. त्याच्या दीड तास आधी ते अटारी वाघा सीमेतून भारतात पोहोचले होते. प्रतिकुल परिस्थितीशी लढताना लागणारे धैर्य आणि शालिनतेचे उदाहरण त्यांनी देशासमोर ठेवले. त्यांच्या गुणाचे राजकारणी, वायुसेनेचे अधिकारी, तज्ञ तसेच संपूर्ण देशाने कौतुक केले.