Abhinandan Varthaman : पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून दिली आहे. 2018 मध्ये भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthman) यांना दिलेल्या चहाचं बिल (Tea Bill) पाकिस्तानने सोशल मीडियावर (Social Media) जाहीर केलं आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या (PMLA) अधिकृत ट्विटर हँडलवर हे बिल शेअर करण्यात आलं आहे. नेते आणि सैन्याच्या नापाक हरकतींमुळे सोशल मीडियावर नेहमीच मस्करीचा विषय असलेल्या पाकिस्तानाने पुन्हा एकदा खालची पातळी गाठली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर केलं चहाचं बिल
पाकिस्तानने ट्विटर हँडलवर एक बिल शेअर केलं आहे. P.A.F OFFICER'S MESS चं हे बिल आहे. यावर अभिनंदनचं नाव लिहिण्यात आलं असून त्यात त्याला देण्यात आलेल्या चहाची किंमत लिहिली आहे. एक चहा अस लिहिण्यात आलं असून किंमतीच्या रकान्यात मिग-21 असं लिहिलं आहे. या बिलाच्यामाध्यमातून पाकिस्तानने भारताची खिल्ली उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 


अभिनंदनला बनवलं होतं बंदी
2019 मध्ये MIG-21 चालवणाऱ्या अभिनंदन वर्धमानचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत क्रॅश झालं. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना बंदी बनवलं. ताब्यात असताना पाकिस्तानी सैन्याने त्यांना चहा दिला होता, याचा व्हिडिओ त्यांनी चित्रित केला. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली. पण त्या फोटोंचा आणि व्हिडिओचा वापर पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या पीएमएल पक्षाकडून भारताची खिल्ली उडवण्यासाठी केली जात आहे. 


भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय सैन्याने पिटाळून लावलं होतं. यावेळी अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकव्याप्त काश्मिरमध्ये कोसळलं. अभिनंदन यांचे रस्तबंबाळ अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानकडून सोशल मीडिआवर शेअर करण्यात आले. भारताने घेतलेली आक्रमक भूमिका तसंच अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्सने दबाव टाकल्याने पाकची पुरती कोंडी झाली. त्यामुळे तत्कालीन इम्रान खान सरकारला अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करावी लागली.


पाकिस्तानचं शेपूट वाकडंच
पाकिस्तानकडून अभिनंदन यांच्या फोटोची खिल्ली उडवण्याचा हा पहिलाचा प्रसंग नाही. याआधी 27 फेब्रुवारीला पाकिस्तान क्रिकेट प्रीमिअर (PSL) लीगमध्ये त्यांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. लाहोर कलंदर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यादरम्यान सामना सुरु होता. सामन्याच्या  ब्रेकमध्ये स्टेडिअममधल्या मोठ्या स्क्रिनवर हातात चहाचा कप घेतलेला अभिनंदन यांचा फोटो दाखवण्यात आला होता.