नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मीरमधील पुंछ, राजौरी आणि मेंढर परिसरात १८० ते २०० दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. इतकचं नाही तर, नियंत्रण रेषेवरील पीर पंजाल रेंजमध्येही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करु शकतात. 


सूत्रांच्या मते, २०१८ या वर्षात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे २० सैनिक मारले गेले आहेत तर, ७ जखमी झाले आहेत. २०१७ मध्ये हा आकडा १३८ होता तर १५६ जखमी होते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असुन त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडून एक विशेष प्लान आखण्यात आला असून त्यानुसार ही कारवाई सुरु आहे.


सुंजवान येथील सैन्य शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला होता. या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असून, याची किंमत पाकला चुकवावी लागेल असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं. या दहशतवादी हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.