२०१७मध्ये भारतीय लष्करानं १३८ पाकिस्तान सैनिकांचा केला खात्मा
२०१७ या वर्षामध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली : २०१७ या वर्षामध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराचं प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानच्या १३८ सैनिकांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानचा सामना करताना भारताच्या २८ सैनिकांना वीरमरण आलं.
भारतीय लष्करानं मागच्या एका वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादी कारवयांचा ठोस समाचार घेतला आहे.
पाकिस्तानचे १५५ सैनिक जखमी
भारतानं पाकिस्तानच्या १३८ सैनिकांचा खात्मा केला तर पाकिस्तानचे १५५ सैनिक जखमी झाले. सीमेवर गोळीबारी आणि अन्य घटनांमुळे भारताचे ७० सैनिक जखमी झाले. २०१७मध्ये पाकिस्ताननं ८६० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. २०१६ मध्ये हीच आकडेवारी २२१ एवढी होती.
२५ डिसेंबरला भारताच्या ५ सैन्य कमांडोंच्या समुहान नियंत्रण रेषा पार केली आणि पाकिस्तानच्या ३ सैनिकांना कंठस्नान घातलं होतं. पाकिस्तानी लष्करानं ट्विटरवरून हे मान्य केलं होतं. पण काही वेळानंतर हे ट्विट हटवण्यात आलं.
स्नायपरचं २७ सैनिकांना कंठस्नान
मागच्या वर्षी स्नायपर फायरिंगमध्ये भारतानं पाकिस्तानच्या २७ सैनिकांना ठार केलं. तर एलओसीवर पाकिस्तानी स्नायपर फायरिंगमध्ये भारताचे ३ जवान शहीद झाले.