जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाईदरम्यान सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी लपलेलं घर रॉके़ट लाँचरने उडवलं आहे. लष्कराच्या या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाम येथे भारतीय लष्कराकडून सुरु असलेल्या कारवाईचा हा दुसरा दिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त कारवाई करत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी या कारवाईसंबंधी माहिती देताना घटनास्थळी काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या असल्याची माहिती दिली आहे. तसंच ही कारवाई सध्या अंतिम टप्प्यात असल्याचंही सांगितलं आहे. सध्या संपूर्ण परिसराची झडती घेतली जात आहे.


याआधी काश्मीर झोन पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं होतं की, कुलगामच्या दमहाल हांजी पोरा परिसरात गुरुवारी चमकक सुरु झाली होती. यावेळी सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं होतं. दोन्हीकडून गोळीबार सुरु होता. 


परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांनी आपल्याला घेराव घातल्याचं लक्षात येताच गोळीबार सुरु केला होता. यानंतर भारतीय जवानांनीही गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं होतं. 


उरी सेक्टरमध्ये 2 दहशतवादी ठार


बुधवारी नियंत्रण रेषेजवळ उपी सेक्टर येथे दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला. लष्कराने कारवाई करत 2 दहशतवाद्यांना ठार केलं. 


दहशतवादी खराब हवामान आणि दृश्यमानतेचा फायदा घेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय लष्करानुसार, ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लाँच कमांडर बशीर अहमद मलिक आणि अहमद गनी शेख अशी पटली आहे. बशीरने नियंत्रण रेषेजवळ अनेक दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत केली होती. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला.