श्रीनगर : सीमेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय सेनेकडून पाकिस्तानला योग्य प्रत्यूत्तर देण्यात आलं. परंतु, या पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय जवान संदीप थापा शहीद झाले. सेनेचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानंही गोळीबारानं प्रत्यूत्तर दिलं... यामध्ये पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सेनेला नुकसान पोहचवलंय. या गोळीबारात भारतीय सेनेचा लान्स नायक संदीप थापा शहीद झाले. ३५ वर्षीय संदीप थापा उत्तराखंडच्या राजावाला गावचे रहिवासी होते. त्यांच्या पत्नीचं नाव निशा थापा असं आहे. 


नौसेरा आणि राजौरीशिवाय पाकिस्ताननं मेंढरच्या कृष्णा खोऱ्यातही शस्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानानं या भागांना आपल्या निशाण्यावर घेत गोळीबार केला.


संदीप थापा शहीद झाल्याचं वृत्त मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आज रात्रीपर्यंत थापा यांचं पार्थिव देहरादूनला पोहचू शकेल. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील. उल्लेखनीय म्हणजे, थापा यांच्या कुटुंबातील अनेक जण भारतीय सेनेतच आहेत. संदीप यांचे पिता रिटायर सूभेदार आहेत तर दोन भाऊ भारतीय सेनेत कार्यरत आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लान्सनायक संदीप थापा यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय.