ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : कोरोनाचा (Corona) फैलाव सातत्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची (Indian Army) रूग्णालयं सामान्य नागरिकांसाठी खुली केली जाऊ शकतात. जनरल मनोज नरवणे (Manoj Narawane) यांनी यासंबंधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात मिळून लष्कराची 9 रूग्णालयं आहेत. तर मुंबई, लोणावळ्यात नौदलाची 2 रूग्णालयं आहेत. या लष्कर, नौदल रूग्णालयांतून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतील. त्यामुळे कोरोनाचा प्रभावीपणे सामना करणं, राज्य सरकारला शक्य होणार आहे. 


याशिवाय आपत्कालिन खरेदीचे अधिकारही लष्कराला देण्यात आले आहेत. सोबतच लसीकरण झालेल्या निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही कोरोनाविरोधातल्या लढाईत मदत घेण्याचा विचार सुरू आहे.



रुग्णसंख्या वाढली 


भारतात कोरोनाचा कहर वाढतच चाललाय. गेल्या 24 तासांत 3 लाख 14 हजार 835 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. देशात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. कुठल्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासांत 2104 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. यावर्षी 8 जानेवारीला अमेरिकेत 3 लाख 7 हजार रुग्ण एका दिवसांत आढळून आले होते. आता भारतात आज सर्वाधिक 3 लाख 14 हजार 835 रुग्ण एकाच दिवसांत आढळून आलेत.