भारतीय लष्कराचा धुमसत्या काश्मीरचं चित्र बदलण्यासाठी पुढाकार
धुमसत्या काश्मीरचं चित्र आता बदलतंय
श्रीनगर : पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर. गेल्या काही वर्षांत या नंदनवनाला बेचिराख करण्याचा डाव फुटीरतावाद्यांचा आहे. फुटीरतावादी फूस लावतात आणि काश्मीरचा तरुण हाती दगड घेतो. याच काश्मीरी तरुणांचे दगड आपल्या अंगावर झेलूनही भारतीय लष्कर त्यांच्यासाठी अतिशय चांगलं काम करतंय आणि त्यातूनच एक मोठं लक्ष्य साध्य झालं आहे.
धुमसत्या काश्मीरचं चित्र आता बदलतंय. त्यासाठी भारतीय लष्करानंच पुढाकार घेतला आहे. लष्कराच्या या प्रयत्नाला काश्मीरच्या तरुणांनीही दाद दिली. काश्मीरी तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी भारतीय लष्करानं विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. सध्या या 36 पैकी 28 विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरलेत. 9 विद्यार्थ्यांनी आयआयटी जेईई अॅडव्हान्स परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. या काश्मीरी विद्यार्थ्यांनीही भारतीय लष्कराचे आभार मानले.
भारतीय लष्करानं 2013 मध्ये इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. या प्रशिक्षण केंद्रात दाखल होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. दरवर्षी जम्मू काश्मीरमधल्या दोन हजार विद्यार्थ्यांमधून चाळीस विद्यार्थ्यांची निवड होते. या विद्यार्थ्यांचा राहण्या-खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सरकार करतं.
धुमसत्या काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे कल वाढतोय. विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहता, यंदाच्या वर्षीपासून या प्रशिक्षण केंद्रात 40 ऐवजी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. एकीकडे सीमेवर तैनात जवान शत्रूला चारी मुंड्या चीत करत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे काश्मीरी तरुणाच्या हाती बंदुकीऐवजी पेन देण्याचाही भारतीय लष्कराचा प्रयत्न आहे. काश्मीरला पुन्हा नंदनवन करण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल आहे.