प्रवासानंतर कॅबमध्ये सर्वात जास्त कोणती वस्तू विसरता, माहिती आहे का? जाणून घ्या
भारतात असे अनेक लोक आहेत जे दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. अनेकजण आपले सामान कॅबमध्येच विसरतात.
मुंबई: प्रवासादरम्यान आपल्या सोबत आपण काही आवश्यक वस्तू घेऊन जातो. आपण रोज घरातून ऑफिसला आणि ऑफिसवरून घरी असा प्रवास करतो. कधी कधी लांबच्या प्रवासाची योजनाही आखतो. त्यामुळे प्रवासात आवश्यक असलेल्या वस्तू आपण घेऊन जातो. बॅग, छत्री यासारख्या वस्तू आपल्या सोबत गरजेनुसार असतात. मात्र अनेकदा आपण या वस्तू ट्रेन, बस, कॅब आणि रिक्षात विसरून जातो. भारतात असे अनेक लोक आहेत जे दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. अनेकजण आपले सामान कॅबमध्येच विसरतात. कधी वेळेवर वस्तू मिळतात तर कधी मिळत नाही. कॅब प्रवाशांच्या विसरण्याच्या सवयीवर एका कॅब सर्व्हिस कंपनीने डेटा तयार केला आहे. विसरभोळ्यांच्या यादीत मुंबईकर आघाडीवर आहे. तर कॅबमध्ये सामान विसरणाऱ्या लोकांच्या यादीत देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कॅबमध्ये सामान विसरणाऱ्यांच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील लोक पहिल्या क्रमांकावर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील लोक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनऊ तिसऱ्या तर कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. कंपनीने म्हटले आहे की, बहुतांश लोक कॅबमध्ये मोबाईल विसरतात. सामान टाकण्याच्या यादीत कॅमेरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्या स्थानावर बॅग, चौथ्या स्थानावर पाकीट आणि पाचव्या स्थानावर स्पीकर आहे.
कंपनीच्या आकडेवारीनुसार, शनिवारी बहुतेक लोक कॅबमध्ये कपडे विसरतात. बुधवारी लॅपटॉप, रविवारी पाण्याची बाटली आणि हेडफोन किंवा स्पीकर विसरतात. कॅबमधून प्रवास करणारे लोक दुपारी 1 ते 3 या वेळेत बहुतेक सामान विसरतात.
कॅब चालकांचे म्हणणे आहे की, "जेव्हा त्यांच्या कारमध्ये कोणतीही वस्तू शिल्लक राहते तेव्हा ते शक्य तितक्या लवकर परत करण्याचा प्रयत्न करतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेहमीच्या गोष्टी विसरण्यासोबतच लोक कॅबमध्ये घेवर, बासरी, आधार कार्ड, डंबेल, बाईक हँडल, क्रिकेट बॅट, स्पाइक गार्ड आणि कॉलेज सर्टिफिकेट यांसारख्या गोष्टीही विसरून जातात.