केंद्र सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर देशातील कोट्यवधी गरीब जनतेला एक मोठी भेट दिली आहे. सरकारकडून देशातील गरीब जनतेला मोफत तांदूळ वाटप केलं जाणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) मंजूरी दिली आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. तर डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना लागू राहाणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने तब्बल 17 हजार कोटींहून अधिक रकमेचे बजेट निश्चित केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अन्न कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत 17,082 कोटी रुपयांच्या बजेटसह पौष्टिक तांदळाचा (Fortified Rice) मोफत पुरवठा 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोफत वाटप करण्यात येणाऱ्या या तांदळात पोष्टिक घटकांचा समावेश आहे. हा तांदूळ शरीरातील रक्ताची कमी दूर करण्यासाठी आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


डिसेंबर 2028 पर्यंत मोफत तांदूळ
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ( PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत फोर्टिफाइड तांदून मोफत वाटपासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची  माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. मोफत फोर्टिफाइड तांदूळ पुरवठ्यासाठी एकूण 17,082 कोटी रुपयांची आर्थिक योजना असेल. हा खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे, अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.


मोदी सरकारची या योजनांनाही मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने राजस्थान आणि पंजाबमधल्या सीमाभागात पक्के रस्ते बनवण्यासाठीही मंजूरी दिली आहे. या भागात 2,280 किलोमीटर रस्त्यांची बांधणी केली जाणार आहे. यासाठी  4,406 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.  याशिवाय गुजरातमधील लोथल इथ राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या (NMHC) विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल तयार करणे हा यामागचा उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हटलं आहे. 


याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी महाराष्ट्रसाठी 7,600 कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट दिलीय. आज या योजनांची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पीएम मोदी यांनी 10 वैद्यकिय महाविद्यालयांचं (Medical College) उद्घाटनही केलं.