व्हिएतनामहून दिल्ली विमानतळावर उतरले `बंटी-बबली`, बॅगेतलं सामान पाहून अधिकारी हैराण
दिल्ली विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला मोठा पर्दाफाश
International Arms Smuggling : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका भारतीय जोडप्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
व्हिएतनामहून एक जोडपं दिल्ली विमानतळावर उतरलं. सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्या सामानाचा तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या बॅगेतलं सामान पाहून सुरक्षा अधिकारीदेखील हैराण झाले. त्यांच्या बॅगेत चक्क पिस्तुलं सापडली. दोन ट्रॉली बॅगमध्ये तब्बल 45 खरीखुरी पिस्तूल होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या पिस्तुलांची किंमत जवळपास 12 लाख रुपये इतकी आहे.
भारतीय जोडपे दिल्ली विमानतळावर उतरलं होतं आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची नजर चुकवून ते दोघंही विमानतळाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते.
संशयावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रॉली बॅग तपासली. बॅग उघडल्यावर अधिकारीही चक्रावून गेले. जप्त करण्यात आलेली सर्व 45 पिस्तुले नवीन असल्याचे सांगण्यात येत आहे. ही शस्त्र कोणी दिली आणि कोणाकडे पोहोचवली जाणार होती याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.