धक्कादायक! पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा छळ
अधिकाऱ्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही विनाकारण चौकशी करून त्रास दिला जातो.
नवी दिल्ली: आम्ही भारताशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे तुणतुणे वाजवणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकीकडे भारताशी संबंध सुधारायचे नाटक करायचे आणि प्रत्यक्षात मात्र शक्य होईल त्या मार्गाने भारताला त्रास द्यायचा ही पाकिस्तानची जुनी खोड जायला तयार नाही. याचे आणखी एक चीड आणणारे उदाहरण समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये जाणुनबुजून त्रास दिला जातोय. अनेकदा सांगूनही या अधिकाऱ्यांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात आलेले नाही. याशिवाय, या अधिकाऱ्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही विनाकारण चौकशी करून त्रास दिला जातो. इतकेच नव्हे तर काही वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या घरातील इंटरनेटसेवा वारंवार खंडित केली जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात घुसखोर शिरला होता. राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी कडेकोट सुरक्षा असणे अपेक्षित असते. मात्र, तरीही हा प्रकार कसा घडला, याबद्दल पाकिस्तानकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या सर्व घटना समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला जाब विचारला आहे.