भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट; आर्थिक वृद्धीदरात विकसित देशांनाही सोडलं मागे
.Indian economy | कोरोना संसर्गामुळे भारतीय अर्थव्यवस्था 2020-2021 मध्ये मोठ्या प्रमाणात घसरली होती. एनएसओच्या मते आर्थिक वर्ष 2021-22मध्ये देशाचा जीडीपी 147.36 लाख कोटी रुपये झाला असून गेल्या वर्षी देशाचा जीडीपी 135.58 रुपये इतका होता
मुंबई : कोरोना काळातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने सुस्साट गती पकडली आहे. आता भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. आर्थिक वृद्धीदर 8.7 टक्क्यांवर पोहचला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने चीन, अमेरिका आणि ब्रिटेनसारख्या विकसित अर्थव्यवस्थांना मागे टाकलं आहे. वार्षिक आर्थिक वृद्धीदराच्याबाबतीत भारताने अनेक देशांना मागे टाकलं आहे. या दरम्यान चीनची अर्थव्यवस्था 8.1 टक्क्यांच्या दराने वाढली आहे. तर ब्रिटेनच्या अर्थव्यवस्थेने 7.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. अमेरिका (5.7%) याबाबतीत फ्रांसच्या(7%) मागे आहे.
NSO ने जारी केले आकडे
देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 4.1 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पूर्ण वर्षात आर्थिक वृद्धीदर 8.7% इतका राहिला आहे. राष्ट्रीय संख्याकी कार्यालातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर - डिसेंबर 2021 च्या तिमाहीत वृद्धीदर 5.4 टक्के इतका होता तर, जानेवारी - मार्च2021 च्या तिमाहीत वृद्धीदर 2.5टक्के इतका होता.
कोरोना महामारीनंतर वेगवान तेजी
याआधी, 2020-21 या वर्षात कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेत 6.6 टक्क्यांची घसरण झाली होती. NSO च्या मते, 2021-22 या आर्थिक वर्षात वास्तविक GDP 147.36 लाख कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वी 135.58 लाख कोटी रुपये होता. मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील वाढीचा आकडा NSO च्या अंदाजापेक्षा कमी आहे.