`रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंती, आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारी...` मोदी सरकारवर गंभीर आरोप
Farmer Protest Latest Update: देशातील शेतकरी पुन्हा एकाद रस्त्यावर उतरला आहे. चार फेऱ्यांनंतरही चर्चा अपयशी ठरल्याने शेतकरी आात आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेतून कोणताचा तोडगा निघालेला नाही.
मुंबई : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी (Farmer Protest) आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने (Modi Government) रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकतं. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
'देशातला शेतकरी देशोधडली लागला'
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेलं नाही उलट शेतकरी देशोधडीला लागला आहे असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. दोन वर्षापूर्वी लाखो शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्याविरोधात वर्षभर तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरिही निर्ढावलेल्या, गेंड्याच्या कातडीच्या हुकूमशाही सरकारने शेतकऱ्यांचा वर्षभर छळ केला. खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून अपमान केला. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर सरकार नमले आणि काळे कायदे रद्द केले पण शेतमालाला हमी भाव देण्याचा कायदा मात्र अद्याप केला नाही,
शेतकरी देशाचा नागरिक नाही का?
याच मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मोदी सरकारने या शेतकऱ्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, त्यांची धरपकड सुरु केली आहे. दिल्लीच्या तीन्ही सीमांवर पोलिसांबरोबरच निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी देशाचा नागरिक नाही का? आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत येण्यापासून त्यांना रोखण्याचे कारण काय? आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीपणा वाटतो का? असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत. 10 वर्षापासून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केले आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेती साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. शेतकरी सन्मान योजनेखाली शेतकऱ्यांचा अपमानच केला जात आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा सरकारला हा शेतकरीच सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने देशभर आंदोलने केली. खासदार राहुल गांधी यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आता केलेल्या मागण्यांनाही काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला तर हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासनही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी जाहीरपणे दिलं आहे, असेही नाना पटोले म्हणाले.