नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गलवान खोऱ्यात भारताची स्थिती आधीपासून स्पष्ट आहे. वास्तविक नियंत्रण रेखा (LAC)बाबत चीनचे दावे स्वीकारले जाणार नाहीत, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारताकडून कधीच एलएसीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बऱ्याच कालावधीपासून आम्ही या भागावर गस्त देत आहोत. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सीमाभागात उभारलेल्या पायाभूत सुविधा भारताच्या बाजूच्या आहेत,' असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. 


मे २०२० पासूनच सीमेवर भारत नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत आहे, पण चीनकडून यामध्ये बाधा घालण्यात येत आहे. यामुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारत परिस्थितीमध्ये एकतर्फी बदल करत असल्याचा आरोप आम्ही स्वीकारत नाही. आम्ही सीमेवर सगळ्या नियमांचं पालन केलं आहे. भारत आहे ती स्थिती कायम ठेवण्याच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.


चीनने शुक्रवारी रात्री दिलेल्या वक्तव्यामध्ये गलवान खोऱ्यावर आपला अधिकार सांगितला होता. गलवान खोरं हे चीनचा भाग आहे आणि एलएसीच्या आमच्या बाजूला आहे. भारतीय सैनिक या भागात जबरदस्ती रस्ते आणि ब्रीज बांधत आहेत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाऊ लिजियन म्हणाले.